हितेन नाईक, पालघरमाहीम-केळवे रस्त्यावरील शांतशील हॉटेलच्या जवळ ‘शीतल सागर’ या रहिवासी संकुलाचे बांधकाम राज्यमार्ग क्र. ४ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अंतर न सोडता करण्यात आल्याने त्याच्या सर्व परवानग्या स्थगित करून फ्लॅट व गाळे विक्रीला मनाई केल्याचे आदेश पालघरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.माहीम-केळवे रस्त्यावरील व माहीम ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्र .७३३/१ पै क्षेत्र ०.२५.० या जागेत अप्पर जिल्हाधिकारी, जव्हार यांनी ’शीतल सागर’ या दोन मजली रहिवासी संकुलाचे बांधकाम करण्यास अनिल रामचंद्र गोयल व इतरांना परवानगी सन २०१२ मध्ये दिली होती. मात्र त्यांनी महसूल विभागासह तत्सम विभागाने दिलेल्या शर्ती, अटीचे पालन न करता रस्त्यालगतच बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याची तक्रार पालघर तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष निलेश रमेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.झालेल्या सुनावणीत नगर रचनाकार शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे बांधकाम सुरू असले तरी हा रस्ता महामार्ग घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशा प्रमाणे रस्त्याच्या मध्या पासून आवश्यक ते ४० मीटरचे अंतर सोडणे अपेक्षित असतांना रस्त्यापासून अवघ्या १२.२५ मीटर्स अंतरावर तळमजला आणि दोन मजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. हे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास म्हात्रे यांचे वकील मंदार पाटील यांनी आणून दिले. हे बांधकाम महामार्गाच्या आड येत असल्याने दूर करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवून संबंधित विभागाने ४० मीटरच्या खुणाची हद्द निश्चित करावी असे आदेश पालघर तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या इमारतीच्या फ्लॅट्स आणि गाळे यांच्या खरेदी विक्रीस हि मनाई केली आहे.
शीतल सागर फ्लॅटविक्रीस मनाई
By admin | Published: January 30, 2017 1:30 AM