कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने आंबिवलीच्या टेकडीवर १५ हजार झाडे लावली असून, ती सगळी झाडे जगली आहेत. या झाडांना सौर ऊर्जेच्या आधरे ठिबक पद्धतीने दररोज पाणी दिले जाते. तेथे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. एका वर्षात चार ते पाच फूट उंच झाडे वाढली आहेत. भविष्यात येथे पर्यटनस्थळ व पक्ष्यांचे अभयारण्य उभारण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली आणि उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी पत्रकारांचा पाहणीदौरा आयोजित केला होता. यावेळी कोळी-देवनपल्ली यांनी वरील माहिती दिली.महापालिका एमएमआरडीएच्या माध्यमातून रिंगरोड विकसित करत आहेत. या प्रकल्पात महापालिका हद्दीतील जवळपास दोन हजार १०० झाडे तोडण्यात येणार आहे. सध्या या रस्त्याचे दुर्गाडी ते टिटवाळा टप्प्यातील काम सुरू आहे. एखादा प्रकल्प राबवताना त्यात बाधित होणारी झाडे तोडण्यात येतात. मात्र, त्या बदल्यात पाच पटीने झाडे लावली जात नाही. त्यामुळे रिंगरोडसाठी झाडे तोडण्यापूर्वीच आंबिवली येथील ३८ एकर जागेत झाडे लावण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला. वनखात्याने त्यासाठी ३८ एकर जागा वृक्षारोपणास देण्याचे मान्य केल्यावर महापालिकेने एमएमआरडीए सोबत सामंजस्य करार केला. एमएमआरडीएने त्यासाठी महापालिकेस दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून ही झाडे लावली आहेत.
तीन बाय तीन मीटरच्या अंतराने बकूळ, आंबा, कडूनिंब, पेरू, मोहराणी, जांभूळ, टबेबुआ, चेरी, कदंब, कांचन, बदाम, सातवीन, वड, पिंपळ, ताम्हण, अर्जुन काजू, शिसव, फणस, चिंच, कैलासपती, खाया, बहावा आदी झाडे २०१८ मध्ये पावसाळ्यात लावण्यात आली आहेत.पुढील तीन वर्षांत तेथे जंगल उभे राहू शकते. त्यामुळे तेथे भविष्यात पक्षी अभयारण्य तयार करण्याचा मानस कोळी-देवनपल्ली यांनी व्यक्त केला आहे.
स्वयंचलित यंत्रणाझाडे लावण्याचे काम दिलेल्या कंत्राटदारावरच झाडे जगवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. किमान तीन वर्षे एकही झाड मरण पावणार नाही, अशी अट संबंधित कंत्राटदाराला घातली आहे. टेकडीच्या पायथ्याशी तीन विहिरी वर्षा जलसंचयनातून तसेच एक बोअरवेल खोदली आहे. या बोअरवेलमधून सौरऊर्जा पॅनलद्वारे प्रत्येक झाडाला ठिबक पद्धतीने पाणी दिले जात आहे. या पद्धतीने एका तासाला सहा लीटर पाणी एका झाडाला दिले जात आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत पाणी ठिबक पद्धतीने दिले जाते. ही पाणी देण्याची यंत्रणा स्वयंचलित आहे. त्यामुळे वीज बिलाचाही प्रश्न नाही. त्यासाठी मनुष्यबळाचा वापर कमी करण्यात आला आहे.