उल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तो त्वरित निकाली काढा. तसेच धोकादायक इमारतीचे भिजत घोंगडे ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असे निवेदन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पालिका आयुक्तांनाही या निवेदनाची प्रत देत यातून मार्ग काढण्याचे सुचविले आहे.
गेल्या महिन्यात शहरातील मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचे बळी गेले. तसेच यापूर्वी स्लॅब कोसळून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्याने, धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्लॅब कोसळून बळी जाण्याची दुसरी घटना घडण्यापूर्वी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. इमारत पडल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यापेक्षा धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जिवंतपणी काय करता येईल याचा विचार करा, असे पाटील यांनी सुचविले आहे.
शहरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र द्या, १० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी हजारो इमारतीला महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत. त्या नोटिसा मागे घेऊन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने सरसकट स्ट्रक्टरल ऑडिट करा, इमारत पुनर्बांधणीसाठी एकाच ठिकाणाहून परवानगी द्या, स्ट्रक्चरल ऑडिटसाठी अधिकृत वास्तूविशारदाची यादी व संपर्क क्रमांक महापालिकने जाहीर करणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी निर्वासित छावणी उभारणे, बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करणे, आदी मागण्या केल्या आहेत.