जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध हाेण्यासाठी ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग अचानक खचल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. परंतू, एक ते दिड महिन्यापुर्वीच हा भाग खचला असून त्याची आयआयटीच्या पथकाने पाहणी केल्याचे महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. या निमित्ताने चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
घोडबंदरच्या गायमुखखाडी किनारी भागात ही चाैपाटी उभारण्यात आली आहे. ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारली आहे. ती जागा मेरिटाइम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे १२ कोटी ८४ लाख निधी दिला आहे. मेरिटाइम बोर्डाने या चौपाटीचे काम केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या चौपाटीचे उद्घाटन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये झाले होते. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्र समाज माध्यमांवर बुधवारी प्रसारित झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.
यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी येथे धोकापट्टी लावून परिसरात प्रवेश बंद केला आहे. या वृत्तास महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. एक ते दिड महिन्यांपुर्वी चौपाटीचा काही भाग खचला आहे. त्याचवेळेस त्याठिकाणी धोकापट्टी लावून तो परिसर प्रवेश बंद केला आहे. खचलेल्या भागाची आयआयटीच्या पथकाकडून पाहाणी करण्यात आली असून त्याचा त्यांनी अहवालही दिला आहे. खाऱ्या पाण्यामुळे खाडीलगतच्या खांबामधील लोखंड गंजल्याने हा प्रकार घडला असून याठिकाणी आयआयटीने सुचविल्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी साडे तीन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव मंजुर होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.