ठाणे: आजकाल २०० कविता लिहीणारे कवी देखील आहेत. पण त्याच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही अशी टीका सुप्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या माधवी घारपुरे यांनी केले. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक आदान प्रदान महोत्सवात निरुपणकार धनश्री लेले लिखीत ‘सोनचाफ्याची फुले’ (द्वितीय आवृत्ती) या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
ललित लेखन म्हणजे शब्दांचा उत्सव आणि दुकानाच्या बाहेर साड्या नेसवलेले पुतळे नव्हे तर संस्कार, विचार आणि भावना याचे प्रगतीकरण म्हणजे ललित लेखन असे मार्गदर्शनपर वक्तव्य घारपुरे यांनी पुढे बोलताना केले. त्या म्हणाल्या, आपण प्रत्येक जण लेखक आहोत, आपल्यात प्रतिभेचा अकुंर आहे पण तो कोणीतरी फुंकर घालून फुलवावा लागतो. गुलाब आणि मोगऱ्यापेक्षा सोनताफ्याला त्याच्या गुणधर्माने जास्त मान असतो, त्याची तुलना कोणत्याही फुलाशी नाही. हे फुल पुष्पगुच्छात दिसत नाही कारण त्याला स्वतंत्र ओळख आहे. या फुलाचे गुणधर्म या पुस्तकात दिसते. माणूस सहृदय असेल तर ललित लेखन जन्माला येते अशा शब्दांत लेखिका लेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ललित लेखनाची गुणवैशिष्ट्य मी पाहते आणि जेव्हा मी माझ्या पुस्तकाकडे पाहते तेव्हा मला या गुणवैशिष्ट्याची पारडे किती जड आहे हे दिसून येते. जसा गायकाला गळा असतो तसा लेखकाच्या हाताला नियमीत सराव असावा लागतो आणि मला खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे. व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या उपाध्यक्षा शीला मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, अभिनेत्री दीप्ती भागवत, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर उपस्थित होते. सुत्रसंचालन स्मिता पोंक्षे यांनी केले. ---------------------फोटो : पुस्तक प्रकाशन