ठाणे - ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 9 व 10 ऑगस्ट पर्यंत मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र पालिका क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधितांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांची भेट घेणारअसल्याचे पुरग्रस्तांनी सांगतिले.
उपायुक्त अशोक बुरपुल्ले, संदीप माळवी, मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा ,दिवा उथळसर ,मानपाडा ,नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील जवळपास सहा हजार नागरिकांना पाच किलो गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी, तेल, मीठ कांदे-बटाटे आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.
परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती भाग असलेला नौपाडा येथील भानजीवाडी ,भास्कर कॉलनी, चिखलवाडी, तबेला येथील अतिवृष्टी बाधितांना कुठलीही मदत अद्याप पर्यंत मिळालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उद्या होईल, उद्या होईल असे सांगण्यात येते. वास्तविक ठाणे शहरामधील नौपाड्यातील हा मध्यवर्ती सखल भाग असलेला परिसर मोठ्या प्रमाणात जलमय होत असल्याने येथील नागरिकांना तातडीने मदत मिळणे अपेक्षित होते. परंतु कुठली ही मदत न मिळाल्याने यासंदर्भात नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांची 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा भेट घेऊन तातडीने मदत मिळण्यासंदर्भात आग्रही मागणी करणार आहोत, असे स्थानिकांनी सांगितले.