ठाणे : शहरातील लोकमान्यनगर-शास्त्रीनगर या प्रभाग क्र मांक ६ मधील करोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने येथील टाळेबंदी काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही काहीशी शिथिलता आणली असली तरी या भागातील अत्यावश्यक दुकानांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यावेळेतच ही दुकाने सुरु राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे शहरातील लोकमान्यनगर भागातील एका व्यक्तीचा महापालिकेच्या कळवा रु ग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. परिसरातील नागरिकांची त्याचे अंत्यदर्शन घेतले होते तर अनेकजण त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत पावलेल्या व्यक्तीला करोनाची लागण झालेली होती, अशी माहीती समोर आली होती. यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हा परिसर पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर या भागात करोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे चित्र होते. गेल्या दहा दिवसांपासून हा संपुर्ण परिसर बंद होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये चर्चेअंती येथील टाळेबंदी काहीप्रमाणात शिथील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार विठ्ठल मंदीर मैदानात तात्पुरत्या स्वरु पात फळ आणि भाजीपाला मंडई सुरु करण्यात येणार असून ही मंडई सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दुध डेअरी आणि अन्नधान्याची दुकाने सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार असून त्याचबरोबर औषधांची दुकाने नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. या सर्वच ठिकाणी नागरिकांना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने केल्या आहेत. दुसरीकडे वागळेतही येत्या १० मे पर्यंत पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे, तर कोपरीमध्येही काही निर्धारीत वेळेत दुकाने सुरु राहणार आहेत. तिकडे मुंब्रा आणि दिव्यातही अत्यावश्यक सेवेची दुकाने ही पहाटे ३ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तर कळव्यातही सकाळच्या सुमारासच दुकाने सुरु राहणार असून नागरीकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.