पंकज पाटील , अंबरनाथअंबरनाथ चिंचपाडा येथील मिर्चीवाडी आदिवासी पाड्याच्या डोंगरावर झालेला स्फोट हा घातपातासाठी नसल्याबद्दल तपास यंत्रणांचे एकमत झाले आहे. डोंगरावर लपवून ठेवलेला हा साठा चोरलेल्या स्फोटकांचा असेल, तर ती कोणी आणि कशासाठी चोरली यावर तपासाचा रोख राहणार आहे. ही जागा तशी कमी वर्दळीची असल्यानो झुडपांमध्ये तो साठा होता, पण वणव्याने त्याचे बिंग फोडले आणि काही क्षण सर्व यंत्रणांची दाणादाण उडवली. मिर्चीवाडी हा आदिवासी पाडा शहरापासून लांब नाही. या वाडीच्या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे तेथे जरी वर्दळ असली, तरी ज्या डोंगरावर हा स्फोट झाला, तेथे सहसा कोणी जात नाही. त्यामुळे स्फोटके लपविण्यासाठी हीच जागा निवडली असावी. ही स्फोटके दोन स्वरुपाची असण्याची दाट शक्यता आहे. डोंगराच्या एका बाजुला दगडाची मोठी खदान असल्याने त्यात स्फोट घडविण्यासाठी जी स्फोटके वापरली जातात त्यातील काही भाग चोरुन त्याचा एकत्रित साठा केल्याची दाट शक्यता आहे. खदानीतील दगड फोडण्यासाठी रितसर स्फोटके उपलब्ध करुन दिली जातात. मात्र ती वापरणारे कामगार त्यातील काही अंश चोरुन बाजुला ठेवण्याची शक्यता असते. ही चोरलेली लपवण्यासाठी झुपांचा आधारे घेतल्याचे सांगितले जाते. अनेक आदिवासी मासेमारीसाठीही लहान स्वरुपात स्फोटके वापरतात. आदिवासी त्यांना बार (लाट) असेही संबोधतात. या बारच्या वापरातून नदी आणि तळ्यातील मासे मारले जातात. त्यातील स्फोटकांचा मोठा साठा कोणीतरी करुन ठेवल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पण मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाटेचा एवढा मोठा स्फोट होणे शक्य नाही. मात्र त्याच्या साठ्याचे प्रमाण मोठे असल्यास ती शक्यताही नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी स्फोट घडला त्या ठिकाणी तारही सापडली आहे. त्यामुळेच पोलीस जिलेटीनचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवत आहेत. स्फोटातील घटक कोणता होता याबाबत तर्क असले तरी स्फोट वणव्यामुळेच झाल्याचे स्पष्ट होत आहे. जेथे स्फोटके लपवून ठेवली होती तेथे वणवा पोचताच स्फोट झाला आणि प्रचंड धुरळा उडाला. स्फोटाच्या खालच्या दिशेला वणवा दिसत नसल्याने स्फोटाच्या दणक्याने वणवा विझल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने सर्व नमुने गोळा केले आहेत. श्वान पथकामार्फत तपासणी केल्यावर इतरत्र कोठे आणखी स्फ ोटके लपवली होती का, याचीही तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)घरांना गेले तडे... काचा फुटल्या आदिवासींच्या म्हणण्यानुसार स्फोटानंतरही वणवा सुरुच होता. मात्र जेथे स्फोट झाला, तेथील आग विझलेली होती. स्फोट एवढा प्रचंड होता, की काही घरांना तडे गेले. अनेक घरांच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या दणक्यानंतर आदिवासीनी घरे सोडून बाहेर पळ काढला. स्फोट दगडखाणीत झाल्याचे सर्वाना वाटले होते. नागरिकांनी तेथे धाव घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले, की दगडखाण गुरुवारी बंद होती. त्यामुळे स्फोटाच्या ठिकाणाचा शोध घेत नगरसेवक प्रदीप पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. वणव्याच्या आगीमुळे स्फोट झाल्याचे समोर येताच स्थानिक रहिवाशांनी लगेचच वणवा विझविण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर अग्निशमन विभागही वणवा विझविण्यासाठी पुढे सरसावला. स्फोटापासून ३०० मीटरच्या अंतरावर असलेल्या इमारतींच्या काचाही फुटल्याने तेथील नागरिकही धास्तावले होते. अनेक इमारतींचे सिक्युरिटी अलार्मही वाजत होते.
स्फोटके लपवली कोणी, याभोवतीच फिरणार तपास
By admin | Published: March 17, 2017 6:12 AM