कल्याण, दि. 04 - कल्याण-महिलेची सोनसाखळी चोरुन पळ काढणारे चोरटे वाट चुकल्याने ते पुन्हा घटनास्थळीच परतले. त्यांचा शोध घेत असलेल्या नागरिकांच्या तावडीत ते आपसूकच सापडले. नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे नवीन शर्मा (25) व भिषेख सिंग (20) अशी आहेत. दोघेही कल्याण शीळ मार्गावरील दावडी परिसरात राहतात. नवीन याचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय होता. नुकसान झाल्याने त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग पत्करला. दरम्यान, चोरी करुन पळत असताना वाट चुकल्याने तो पकडला गेला.
कल्याण पूर्वेतील आशिष इमारत राहणा-या हेमलता सिंग विवाहित महिलेवर या चोरट्यांनी पाळत ठेवली होती. ही महिला काल रविवारी दुपारी 12 वाजता बाजारात भाजी खरेदीसाठी गेली होती. ती भाजी घेऊन घरी परतली. इमारतीचा जिना चढत असताना नवीनने तिला जोराचा धक्का दिला. तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. इमारतीच्या बाहेर रस्त्यावर तिचा साथीदार भिषेख हा दुचाकी घेऊन उभा होता. यावेळी महिलेने मदतीसाठी धावा केला. तेव्हा सुमेध हुमाने या तरुणाने तिचा आवाज एकेून मदतीसाठी धाव घेतली. चोरट्यांचा पाठलाग केला.
चोरट्यांनी दुचाकीवरुन धूम ठोकली. ते पसार झाले. पण दुदैवाने ते वाट चुकल्याने ते दुचाकीवरुन फिरुन पुन्हा आशिष इमारतीच्या खालीच येऊन पोहचले. त्यांचा पाठलाग करुन पुन्हा इमारतीच्या ठिकाणी आलेल्या सुमेध हुमाने त्यांना ओळखले. नागरिकांच्या मदतीने त्याने दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.