बदलापूर : बदलापूर रेल्वेस्थानकापासून कर्जत दिशेला काही अंतरावरच रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेची टॉवर व्हॅनही आली होती. दुरुस्तीचे काम संपल्यावर गाडी ट्रॅकवर उभी असताना एक मुलगा या गाडीवर चढला. त्याच्या हाताचा स्पर्श रेल्वेच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला झाला. त्यात तो ७० टक्क्यांहून अधिक भाजला. त्याला लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बदलापूर रेल्वेस्थानकपासून काही अंतरावर रेल्वेकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. बदलापूरच्या गावदेवी ते रमेशवाडी या भागातील नागरिक या भागातूनच रेल्वेमार्ग ओलांडून येजा करत करतात. याच भागात रेल्वेची टॉवर व्हॅन दुरुस्तीचे काम आटोपून थांबलेली होती. यावेळी विठ्ठलवाडी भागात राहणारा कुणाल जगताप (१२) हा मुलगा व्हॅनवर चढला. या व्हॅनवर उभा राहताच त्याचा स्पर्श रेल्वेच्या वीजवाहिनीशी झाला. विजेच्या धकक्यामुळे तो संपूर्ण भाजला आणि खाली कोसळला. क्षणात हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही ही बाब लक्षात आली नाही. जखमी मुलाला बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
वीजवाहिनीच्या स्पर्शाने मुलगा गंभीररीत्या भाजला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 1:38 AM