रोहा : रोहा शहर व रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रुपग्रामपंचायत मढाली खुर्द हद्दीतील सोनगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. निधीअभावी सोनगाव गावातील पाणी योजनेचे काम रखडल्याने येथील महिला व ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील बहुतांश गावात भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. या गंभीर पाणी समस्येकडे अध्यक्षा अदिती तटकरे यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.रोहा तालुक्यातील मौजे सोनगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ सन २०१५ मध्ये झाला असून ही योजना अजूनही अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. योजनेनुसार पहिल्या टप्प्यात विहिरी वेळेवर पूर्ण झाल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी बांधण्यात आली आहे. प्रत्यक्षात टाकी ही कमीत कमी चाळीस ते पन्नास फूट उंचीवर बांधणे आवश्यक असताना टाकी फक्त पाच ते सहा फूट उंचीवर बांधण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात ही पेयजल योजना सुरू झाली तर येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळणे मुश्कील होणार आहे. याविषयी नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अर्थातच लाखो रुपये खर्ची घालून पाणी योजना सुरू झाली तर या योजनेचा लोकांना उपयोग होणे गरजेचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यापासून या भागात भीषण पाणीटंचाई सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून ही पेयजल योजना अर्धवट अवस्थेत असून पाण्यावाचून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने पाइपलाइनसाठी खोदकाम केले होते. परंतु आजतागायत पाइपलाइन न टाकल्याने ग्रामस्थांमध्ये ठेकेदार व सुस्त प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून देय अदा न झाल्याने हे काम प्रलंबित आहे. एकंदरीत पाण्याअभावी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)
निधीअभावी सोनगाव पाणी योजना रखडली
By admin | Published: April 19, 2017 12:42 AM