ठाणे : मोटारसायकलस्वार सोनसाखळी चोरांनी ठाण्यात उच्छाद मांडला असून, दोन दिवसांत सात चोऱ्या केल्या आहेत. या घटनांमध्ये ४ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.बाळकुम भागातील एक महिला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाळकुम भागातून पतीसोबत पायी जात असताना, मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चेन लंपास केली. महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हे सोने २ लाख २० हजार रुपयांचे आहे. दुसऱ्या घटनेत, कोपरी परिसरातील सुगंधा आळशी या शुक्रवारी मैत्रिणीसोबत या भागातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ गप्पा मारत असताना, मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून नेले. शनिवारी कोपरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.आणखी एका घटनेत डोंबिवली येथील एका वृद्ध महिलेचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र दोन मोटारसायकलस्वारांनी शनिवारी नारळीपाड्यातील सर्व्हिस रोडवरून चोरले. राबोडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पाचवी घटना वसंतविहार भागात घडली. या घटनेत तुळशीधाम परिसरातील एका रहिवाशाचा १८ हजार रुपयांचा मोबाइल फोन दोन मोटारसायकलस्वारांनी लंपास केला. विनीत कोटिया यांच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.शास्त्रीनगरातील एक महिला पायी जात असताना, त्यांचे ५२ हजार रुपयांचे मंगळसूत्र दोन युवकांनी शुक्रवारी लंपास केले. वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. डोंबिवलीतील एक रहिवासी भिवंडीकडे आॅटोरिक्षाने जात असताना, दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या हातातून ४ हजार ५०० रुपयांचा मोबाइल फोन शनिवारी बळजबरीने चोरला. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
सोनसाखळी चोरांचा उच्छाद
By admin | Published: April 10, 2017 4:08 AM