ठाणे : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या क्रिकेट सट्ट्यातील प्रमुख आरोपीला मंगळवारी मकोकांतर्गत पोलीस कोठडीत घेण्यात आले. क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाऱ्या आठ आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. मालाड येथील आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कुख्यात गँगस्टर रवी पुजारी टोळी सहभागी असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेदेखील गुन्हे दाखल केले होते. सोनू जालान याच्याविरूद्ध एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा दिल्ली येथे तर उर्वरित मुंबई परिसरात दाखल आहेत. सातपैकी पाच गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. या गुन्ह्यांचा न्यायालयामध्ये खटला सुरू असून, उर्वरित दोन प्रकरणांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सोनूला मंगळवारी विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सोनूच्या संपर्कात अनेक बुकी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांची माहिती आणि या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्यांवर सोनूची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनू जालानला मकोकाअंतर्गत कोठडी पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 5:50 AM