शहापूर : स्टेट बँक ऑफ इंडिया शहापूर शाखेच्या बाजूलाच असलेल्या साई प्लाझा या तीन मजली इमारतीमधील कामाख्या सोनोग्राफी सेंटरला मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे सेंटर आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या इमारतीत बेसमेंट, पहिला, दुसरा व तिसऱ्या मजल्यावर सोनोग्राफी सेंटर, कॅफे नाईन, लहान मुलांचे हॉस्पिटल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, फोटो स्टुडिओ, कोचिंग क्लास, स्टेट बँक असे विविध प्रकारचे एकूण ११ गाळे आहेत. सोनोग्राफी सेंटरच्या वरच्या मजल्यावर विद्या नावाचे लहान मुलांचे हॉस्पिटल आहे. सोनोग्राफी सेंटरला आग लागताच सेंटरमधील उपकरणे जळून खाक झाली. शिवाय पी.एन.डी.टी.चा डाटाही जळून नष्ट झाला, असे टेक्निशियन आकाश सगर यांनी सांगितले. आग पसरत आजूबाजूच्या दुकानांपर्यंत गेली. लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये चार ते पाच मुले दाखल होती. प्रसंगावधान राखून वेळीच त्या मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, असे हॉस्पिटलचे डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले.
किशोर इलेक्ट्रॉनिकचे किशोर भोईर यांनी संपर्क साधून पाण्याचे टँकर मागविले. त्यानंतर जिंदाल कंपनीचे टँकर आले, त्यामुळे आगीचा फैलाव होण्यापासून बचाव करता आला. तरीही अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहापुरात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नाही याची पुन्हा एकदा उणीव जाणवली. कल्याण अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र दोन तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यावर गाडी आली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
-------------------------------------
अग्निशमन दलासाठी करणार पाठपुरावा
आपत्कालीन घटना टाळण्यासाठी शहापूर येथे अग्निशमन दल असावे, अशी मागणी यापूर्वीच केली होती. पुन्हा अग्निशमन दलासाठी पाठपुरावा करणार, असे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले.