जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मोहमद आर्यन या चार वर्षांच्या मुलाचा सावत्र वडिल मोहमद दिलशाद इम्रान (२३) यांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर इम्रान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे. त्याला ३ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.
इम्रान आणि रेश्मा हे गेल्या काही दिवसांपासून लिव अॅन्ड रिलेशनशिप मध्ये पती पत्नी प्रमाणे एकत्रित वास्तव्य करीत आहेत. पत्नीला पहिल्या पतीपासून मुलगा असल्याचे तिने लपवून ठेवले होते. ही बाब इम्रानच्या निदर्शनास आल्यानंतर २८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याने आर्यनचा गळा पकडून लोखंडी सोफ्यावर ढकलले. त्यात त्याच्या पाठीवर मार लागला. यात त्याच्या पाठीच्या मणक्याचे हाड आणि मणका फ्रॅक्चर झाला. तसेच पोटावर मारहाण केल्याने त्याच्या लिव्हर आणि किडणीतही रक्त साकळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार इम्रान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर २९ जुलै रोजी त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी दिली.