लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शहरात जास्तकरून गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. मात्र, आता आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर देत असलेल्या सल्ल्यानुसार शहरातील नागरिकही ज्वारीच्या भाकरीला पसंत देत आहेत. त्यामुळे ज्वारीची श्रीमंती वाढली आहे. मागणी वाढल्याने ज्वारीचा भावही वाढला आहे. वाढीव भाव आणि वाढलेली आवक याचा दुहेरी फायदा शेतकरी, धान्यविक्रेते यांना होत आहे.
शहरी भागात राहणाऱ्या गृहिणींना विशेषत: नोकरदार महिलांना भाकरीपेक्षा पोळ्या करणे जमते. तसेच लंच बॉक्समध्ये भाकरीपेक्षा पोळ्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, ज्यांचे बालपण गावी गेले आहे, अशांना गावापासून पोळीऐवजी भाकरी खाण्याची सवय आहे. त्यातही अनेक जण ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य देतात. शहरी भागात पोळ्या खाल्ल्या जातात. तसेच पोळीभाजी केंद्रांवरही त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गव्हाचे भाव वाढलेले नसले तरी ज्वारीचे भाव वाढलेले आहेत. ज्वारीची भाकरी आरोग्याला लाभदायक असल्याने ज्वारीच्या भावाकडे न बघता शहरातील नागरिक ज्वारी खरेदी करताना दिसत आहेत.
-----------------
ज्वारीची भाकरी पचण्यासाठी हलकी
१. मी एक गृहिणी आहे. मला ज्वारीची भाकरी आहाराच्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. तिच्यात थंड गुण आहे. तसेच ती पचण्यासाठी हलकी असते. त्यामुळे जेवणात ज्वारीची भाकरी असते.
- अर्चना गांगुर्डे
२. मी मूळचा नाशिकचा आहे. मला ज्वारीची भाकरी आवडते. पोळ्या मी खात नाही. गावापासून मला ज्वारीची भाकरी खाण्याची सवय आहे.
- शरद सोनावणे
-----------------
पोळ्या खाण्याची सवय
१. आमच्या ठाणे जिल्ह्यात भात पिकतो. त्यामुळे आम्ही तांदळाची भाकरी खातो. त्यामुळे तांदळाच्या भाकरीनंतर ज्वारीपेक्षा पोळ्या जास्त खातो.
- सरिता चंदने
२. आम्हाला नेहमी पोळी खाण्याची सवय आहे. मात्र, घरी मटणाचा बेत असला तरच आम्ही ज्वारीची भाकरी आणि मटण खातो. त्यामुळे ज्वारी जास्त खाण्यात नसते.
- सुभाष देसले
------------------
ज्वारी महाराष्ट्रातील, गहू उत्तर भारतातील
ज्वारी ही महाराष्ट्रातील आहे, तर गहू हा उत्तर भारतातील आहे. आताच्या वातावरणानुसार ज्वारी कधीही शरीराला चांगली आहे. ज्या भागातील गरज आहे, त्यानुसार त्या ठिकाणी धान्य पिकते.
- डॉ. उदयकुमार पाध्ये, आहारतज्ज्ञ
-----------------
आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच
१. ज्वारी पचायला हलकी असते. त्यामुळे आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर ज्वारी खाण्याचा सल्ला देतात.
२. ज्वारी शरीलाला थंड असते. त्यामुळे तिचा आहारात समावेश हा लाभदायक आहे.
३. पोळीला तेल लावले जाते. ज्वारीच्या भाकरीला तेल लावण्याचा प्रश्न येत नाही. केवळ पाणी, ज्वारीचे पीठ या दोन गोष्टीने भाकरी तयार होते.
-----------------
अधिकारी कोट
ठाणे जिल्ह्यातील हवामानाचा विचार करता येथे भातशेती होते. त्यामुळे ज्वारीचे पीक येथे घेतले जात नाही. एकूणच गहू, ज्वारी आणि तांदूळ असा पसंतिक्रम लागतो. मात्र, ज्वारीचे आरोग्याच्या दृष्टीने गुणधर्म लक्षात घेता आता अनेक जण ज्वारीला पसंती देत आहेत.
- कृषी विभाग, कल्याण
-----------------
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती
प्रति क्विंटल घाऊक बाजारातील दर
ज्वारी
२०२०-१,५०० रुपये
१९९०-७५० रुपये
१९८०-४८० रुपये
गहू
२०२१-२,२०० रुपये
२०२०-२,००० रुपये
२०१९-१,५००
----------------