डहाणू/कासा या तालुक्यातील कासा, वाणगाव भागातील उन्हाळी भातकापणीला सुरूवात झाली असली तरी मजुरांच्या टंचाईमुळे तिची गती संथ आहे.तालुक्यात सूर्या कालव्याच्या पाण्यावर शेतकरी उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात भातशेती, भाजीपाला व भुईमुगाची लागवड करतात. मात्र उशिरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पिकांवर व उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.तसेच काही ठिकाणी कालव्यांचे बांधकाम ढासळलेले आहे तर काही ठिकाणी प्लॅस्टर निघून गेल्याने पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी शेतीला वेळेवर व योग्य पाणीपुरवठा होत नाही त्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो असे शेतकरी सुनील पाटील यांनी सांगितले.दरम्यान, पिकांवर होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव व निकृष्ट दर्जाची बियाणे यामुळे पीक उत्पादन घटते.शेतकऱ्यांनी गेल्या आठवडाभरापासून भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु काही पिके ९० दिवसांची तर काही १०० व ११० दिवसांची होती. गेल्या आठवडाभरापूर्वी शेतीला पाणीपुरवठा झाल्याने शेतात पाणी तसेच ओलावा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे सुरू केली आहेत. त्यांना भातकापणीवरून वाळवण्यासाठी भाताची कडपे बाहेर काढावी लागत आहेत.
मजुरांच्या टंचाईने भातकापणी संथ
By admin | Published: May 10, 2016 1:52 AM