ठाणे : जिल्ह्यात भात उत्पादकतेमध्ये सरासरी २३ टक्के वाढ २०२२ मध्ये झाली आहे. यंदा सन २०२३-२४ मध्ये एकूण ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणीचे लक्षांक ठेवले असून दाेन हजार ७०० किलो प्रति हेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे.
जिल्ह्यात नाचणी पिकाची सरासरी उत्पादकता ९४९ किलो प्रति हेक्टर एवढी असून खरीप हंगाम २०२२ मध्ये एक हजार १३८.१२ किलो प्रति हेक्टर उत्पादकता होती. २०२३-२४ मध्ये एकूण तीन हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असल्याचे ठाणे जिल्हाधिाकरी अशाेक शिनगारे यांनी या ठाणे जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत सांगितले. या हंगामासाठी सुमारे १२ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली असून पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर संकरित बियाणाचा वापराचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचे पुरवठा करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी संदीप कुटे यांनी सांगितले.
यंदाचे नियोजन-
- नागली या पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्रामध्ये ३० टक्के तर वरी पिकामध्ये १० टक्के वाढ करण्यात येणार.
- शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत ३० हजार ४०० मिनी किट वाटपाचे नियोजन आहे.
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगातून नागली व वरी पिकावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देणार.
- सगुणा भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीने एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन
- रत्नागिरी ६ व ८ या वाणांचा १०० हेक्टर क्षेत्रावर ग्रामबिजोत्पादन घेणे.
- बांधावर तूर लागवड क्षेत्रात १० टक्के वाढीचे उद्दिष्ट
- महात्मा गांधी ग्रामीण राेजगार हमी याेजने अंतर्गत मोगरा, सोनचाफा, जांभूळ, फणस या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन
- भेंडी व इतर पिकांच्या निर्यातीस चालना देण्यात येणार.
- विकेल ते पिकेल अंतर्गत भाजीपाला व प्रक्रियायुक्त शेतमालाची थेट शहरी ग्राहकांना विक्री