लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्हा परिषदेने वाटप केलेले भात बियाणे ११० ते १२० दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित होते, पण ते आधीच म्हणजे ५० ते ६० दिवसांत मुदतीआधीच त्याची निसवणी होऊन ते परिपक्व होत असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ८२५ एकरांवर त्याची लागवड झाली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ठाणे जि.प.चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.
यंदाच्या पावसाळ्यात आधीच जुलैमध्ये शेतीचे मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात पीक वाहून जाण्यासह शेतीची बांधबंदिस्ती फुटली. यात शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अतिवृष्टीच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला असून त्याची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यात आता या बोगस बियाण्यांची भर पडली आहे. जिल्हा परिषदेने वाटप केलेल्या या ५० टक्के अनुदानाच्या भात बियाणांची लागवड निष्फळ जात असल्याचा मनस्ताप शेतकऱ्यांकडून ऐकवला जात आहे. कर्ज काढून घेतलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सेस फंडातून ५० टक्के अनुदानाने जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यात महाबीज महामंडळाचे भात बियाणे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कोईम्बतूर-५१ या भात बियाण्याची जवळपास ८२५ एकर क्षेत्रांवर लागवड केली आहे. या बियाण्याचे वाण ११० ते १२९ दिवसांत परिपक्व होणे अपेक्षित आहे. मात्र, ते ५० ते ६०दिवसांच्या मुदतीआधीच निसवणी व परिपक्व होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तक्रारीस अनुसरून चौकशी केली असता निमसे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानभरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
--------