भातसानगर : जून महिन्यात पावसाने सुरुवातीच्या काही दिवसात नियमित हजेरी लावली खरी; मात्र नंतर दडी मारलेल्या पावसामुळे पेरण्या तर रखडल्या आहेत.
पावसाळा सुरू झाला आणि पहिला आठवडाभर दररोज पावसाने हजेरी लावली खरी. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे शहापूर तालुक्यातील पेरण्या आणि उखळण्या रखडल्या आहेत. उखळण्या रखडल्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस वेळेवर लागला तर शेतामध्ये पाणी साचते. शेत भरुन जाते आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे शेताची उखळण चांगली होते. शेतामध्ये आलेले गवत हे त्यामध्ये विरघळून त्याचे एक प्रकारे खत तयार होते. त्या शेतामध्ये गवत अजिबात वाढत नसल्याने पुन्हा उखळणी करण्याची गरज भासत नाही.त्यामुळे वेळ वाचतो व मजुरीही; मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून कडक ऊन पडल्याने शेतात पाण्याचा थेंब नसल्याने नांगरणी करुनही पावसाअभावी गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आता शेतकऱ्याला दोन ते तीन वेळा त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागणार आहे. यासाठी त्याचा वेळ खर्च होणार आहे शिवाय मजुरीही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शिवाय शेतातील गवत मरेल किंवा नाही याची चिंता त्याला लागली आहे.
तालुक्यामध्ये आजही अनेक शेतकरी हे बैलजोडी व लाकडी नांगराचा उपयोग करत आहेत.भातपिकासाठी आवश्यक असलेला चिखल ट्रॅक्टरने होत नसून नांगराने तो व्यवस्थित होतो व त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन लावलेल्या भाताच्या वाढीला त्याचा फायदा होतो.त्यामुळे बैल व नांगर यांच्या मदतीने केलेली नांगरणी फायदेशीर असल्याचे शेतकरी बाळू भेरे यांनी सांगितले.