लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील स्मशानभूमीतून निघणाऱ्या धुराचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना सहन करावा लागू नये याकरिता स्मशानभूमींचे नूतनीकरण करताना चिमण्या बसवण्यात येणार आहेत. ठाण्यातील दक्ष नागरिक ॲड. रामेश्वर बचाटे यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा मुहूर्त कधी उगवणार हे महापालिकेने स्पष्ट केलेले नाही.
शहरातील मुख्य स्मशानभूमी वगळता जवळजवळ सर्वच स्मशानभूमींमध्ये चिमण्या लावण्यात आलेल्या नाहीत. आधी स्मशानभूमी उभी राहिली आणि त्यानंतर लोकसंख्यावाढीमुळे या स्मशानभूमीच्या आजूबाजूला मानवी वस्ती झाली. एखाद्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर धूर थेट नागरी वस्तीमध्ये जात आहे. कोरोना काळात स्मशानभूमीमध्ये मोठ्या संख्येने पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने आजूबाजूच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. जवाहरबाग स्मशानभूमीत तीच परिस्थिती होती. वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत गंभीर परिस्थिती आहे. शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये उंच चिमण्या लावण्याच्या मागणीचा ठाण्यातील दक्ष नागरिक ॲड. रामेश्वर बचाटे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्मशानभूमीमध्ये उंच चिमण्या नसल्याने नागरिकांचे आरोग्य कसे धोक्यात येते याकडे पत्राद्वारे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
निर्णयाची अंमलबजावणी कधी?
अखेर ठाणे महापालिकेनेही बचाटे यांच्या पत्रांची गंभीर दखल घेऊन शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये उंच चिमण्या बसवण्याचा निर्णय घेतला. अर्थात जेव्हा स्मशानभूमीचे नूतनीकरण अथवा विस्तारीकरण होईल त्यावेळी चिमण्या बसवण्यात येणार असल्याने हा निर्णय नेमका कधी अंमलात येईल, याबाबत स्पष्टता नाही.
.......