ठाणे : टीम स्पेसोनोव्हा या संस्थेचा एक भाग म्हणून, परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय तरुणांनी अलीकडेच दोन नवीन लघुग्रह शोधले आणि त्यांना त्या उपग्रहांना नावे देण्याची संधी लाभली आहे. अशा अंतराळप्रेमी भारतीय तरुणांना जागतिकस्तरावर मार्गदर्शन करण्याचे टीम स्पेसोनोव्हाने ठरवले आहे.
अंतराळात पृथ्वीजवळच्या कक्षेत अनेक उपग्रह आहेत ज्याचे आकारमान प्रचंड मोठे आहे. त्यांच्या आकारामुळे भविष्यात पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच शास्त्रज्ञ यासंबंधी अधिकाधिक शोध घेण्यास प्रयत्नशील असतात. भारतातील स्पेसोनोव्हा या टीमने अलीकडेच दोन नवीन लघुग्रह शोधून काढले. इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल सर्च कोलाबोरेशन (आयएएससी) हा नासाचा एक वैज्ञानिक उपक्रम आहे. ज्याद्वारे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना सर्वसमावेशक, विश्वसनीय माहिती दिली जाते.
चार भारतीय शास्त्रज्ञ, शिवम कुमार सिंह, दिव्येश्वरी वानसडिया, रश्मी शेरॉन आणि आयुषी श्रीवास्तव सप्टेंबर २०२० पासून टीम स्पेसोनोव्हामध्ये कार्यरत आहेत. पॅन-स्टार्सच्या प्रतिमांचे विश्लेषण करणे आणि पृथ्वीच्या अंतराळ कक्षेतील वस्तू आणि लघुग्रहांचे निरीक्षण करणे, हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे.
२१ वर्षीय शिवम कुमार सिंह अंतराळ अधिवक्ता असून, स्पेसोनोव्हाचे संस्थापक आणि संचालक आहेत. ही अंतराळ शिक्षण आणि संशोधन संस्था आहे. दिव्येश्वरी (ठाणे) वानसडिया, रश्मी शेरॉन (ठाणे) आणि आयुषी श्रीवास्तव (ठाणे) या महिला खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान संवादक, स्पेसोनोव्हाच्या सदस्य आहेत. या तरुण शास्त्रज्ञांनी २०२५ पर्यंत सर्वांच्या आवाक्यातील अंतराळ संशोधनाचा जागतिक समुदाय स्थापन करण्याचे आपले ध्येय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.