अजित मांडके ठाणे : ठाण्यातील शांतता क्षेत्रात अनेकदा मोठ्या आवाजात लाउड स्पीकर लावण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, शांतता क्षेत्र नसतानाही ठाण्यातील लक्ष्मी चिरागनगर भागातील रहिवाशांना सत्यनारायणच्या पूजेला, हळदीला, शिवजंयतीला अथवा कोणत्याही सण, उत्सवाला लाउड स्पीकर, बॅन्जो वाजविण्याची परवानगी दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जो अशा प्रकारचे कृत्य करेल त्याच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. केवळ रेमन्डच्या गेस्ट हाऊसमध्ये मुंबई, ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांच्या सुचनेनुसारच येथील भाग नो साउंड झोन झाला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मी चिरागनगरच्या रहिवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जानेवारी महिन्यात येथील एका घरात सत्यनारायणची पुजा आयोजिली होती. सकाळी १० च्या सुमारासच पोलिसांनी या कुटुंबाची साउंड सिस्टिम जप्त केली. याच भागातील अन्य एका गरीब मुलीची हळद होती. त्यासाठी येथील रहिवाशांनी अक्षरश: वर्गणी करुन बॅन्जो ठरवला होता. मात्र, तोदेखील सांयकाळी ८ च्या सुमारास पोलिसांकडून जप्त करण्यात आला.ठाण्यातील शांतता क्षेत्रातही नियमांचे उल्लघंन केले जाते. मात्र, त्यांच्यावर अशाप्रकारे तत्परतेने कारवाई केली जात नाही. परंतु, मागील सहा महिन्यांपासून चिरागनगर भागात कोणताही उत्सव असो किंवा सण असो, साउंडचा वापर केला की लागलीच वर्तकनगरचे पोलीस येऊन साउंड, बॅन्जो जप्त करतात.वास्तविक पाहता रात्री १० वाजेपर्यंत साउंड सुरू ठेवण्यास परवानगी असताना अशी चुकीची कारवाई केली जात असल्याने येथील रहिवाशांनी पोलीस आयुक्तांपर्यंत यासंदर्भातील तक्रार केली होती. परंतु, तिचाही काहीच उपयोग झाला नसल्याने दाद मागायची कोठे असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. त्यातही पोलिसांच्या विरोधात बोलायचे झाले, तरी कारवाईची भिती असल्याने ते या तक्रारीच्या बाबतीत बोलतानाही घाबरत आहेत. परवानगी का नाकारली जाते याचे उत्तर पोलिसांकडेदेखील नाही. हा भाग शांतता क्षेत्रही नाही, मग ठाण्यातील इतर भागांप्रमाणेच या भागाला न्याय देणे अपेक्षित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.>म्हणून होते कारवाई...: चिरागनगरच्या बाजूलाच रेमंडचे गेस्ट हाऊस आहे, पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना जरी याचा आवाज झाला तर म्हणे त्रास होत आहे. त्यामुळेच पोलिसांकडून हा कारवाईचा ससेमीरा सुरू झाल्याचेही रहिवासी सांगतात. मात्र, याच रेमंडमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत धिंगाणा सुरू असतो, त्याचा त्रास या वरिष्ठ मंडळींना होत नाही का? असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.>असा कोणताही प्रकार येथे सुरू नाही. केवळ १० वी आणि १२ वीच्या परीक्षा सुरू असल्यानेच येथे साउंडला परवानगी दिली जात नाही.- एस. गायकवाड, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक - वर्तकनगर पोलीस ठाणे
पोलिसांच्या कर्णशांततेसाठी पूजेसाठीही स्पीकरबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 1:02 AM