अजित मांडके, उप-मुख्य वार्ताहर
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर आता खरी शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ठाण्यात शाखा कुणाची यावरून भांडणे होऊ लागली आहेत; मात्र दोन्हीकडील शिवसैनिकांना हे वाद न पटण्यासारखे आहेत. कालपर्यंत ज्या शाखेत एकत्र बसलो, सुख-दु:खाचे क्षण सोबत राहिलो, त्याच शाखेवरून एकमेकांच्या जीवावर उठणे कितपत योग्य आहे. खरेच आज बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे असते तर त्यांना हे आवडले असते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची यावरून न्यायालयात वाद करणे हे योग्य असले तरी त्याबाबतचा निवाडा होण्यापूर्वी शाखांचा ताबा घेण्यावरून परस्परांची डोकी फोडणे गैर आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे गट आणि फडणवीस यांचे सरकार आले. तेव्हापासून राज्यात व सर्वाधिक पडसाद ठाणे जिल्ह्यात पाहावयास मिळाले आहेत. जे स्वत:हून येत आहेत, त्यांना शिंदे गटात सामावून घेतले जात आहे. परंतु जे स्वत:हून येत नाहीत, त्यांच्यासाठी आता ठाण्यात शिंदे गटाकडून साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा वापर केला जात आहे.
कल्याण, डोंबिवलीत देखील शाखेचा ताबा घेण्यावरून प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. गोव्यात काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये विलीन केले गेले. महाराष्ट्रात मात्र खरी शिवसेना ही ठाकरेंची नव्हे तर शिंदे यांची आहे हे सिद्ध करण्याकरिता शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही लढाई न्यायालयात लढली गेली पाहिजे. रस्त्यावर शिवसैनिक हेच शिवसैनिकांचे रक्त सांडत असल्याचे चित्र दिसणे भूषणावह नाही.
शाखा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न
- ठाण्यात शिवसेनेच्या ११० शाखा आहेत. त्या सर्वच शाखांवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. ठाकरे गटाकडून आता नव्याने पदे देण्यात आली आहेत. त्यात शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदींचा समावेश आहे.
- नव्याने नियुक्त झालेले शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी याच शाखांतून कारभार करण्याकरिता ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील अनेक शाखांना कुलूप ठोकले आहे.
- काही शाखा खुल्या आहेत. त्याठिकाणी काल, परवापर्यंत एकत्र बसणारे मित्र आजच्या घडीला एकत्र बसत असतानाही एकमेकांचा चेहरा पाहत नाहीत. दिघे यांनी सुरू केलेली व्यायामशाळा बंद केली. खा. राजन विचारे यांच्या पत्नीच्या संस्थेला दिलेली जागा काढून घेण्यात आली.