ठाणे : जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाकडून जिल्हाभर विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा हाती घेण्यात आलेला आहे. २१ जूनपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा पंधरवडा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे यांनी स्पष्ट केले.
अतिसाराच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात व आंतररुग्ण विभागात ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून या कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रम जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पाडणार असून जिल्हास्तरीय पर्यवेक्षण देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे. अशी माहिती डाॅ. परगे यांनी दिली. जिल्हयात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, दाेन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्रांमध्ये ० ते ५ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ५२ हजार १७३ असून एकूण १ हजार ३०५ आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करून सेवा दिली जाणार आहे.हा कार्यक्रम राबवताना अति जोखमीचे क्षेत्र व दुर्बल घटकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरित मंजूर, बेघर मुले आशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार असून मागील दाेन वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व दूषित पाणीपुरवठा क्षेत्र याकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.