ठाणे - मागील कित्येक वर्षे पारसिक बोगद्यावर साचलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात पालिकेने आता पर्यंत येथून तब्बल ७० मेट्रीक टन कचरा उचलला आहे. तर अजून ५० ते ६० मेट्रीक टन कचरा २ आॅक्टोबरपर्यंत काढला जाऊन येथील परिसराचे रुपडे पालटले जाणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच येथील वाघोबा नगर आणि भास्कर नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज देण्याची घोषणासुध्दा त्यांनी केली आहे. तर बुधवारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारसिकच्या बोगद्याच्यावर वृक्षारोपणाची मोहीमसुध्दा राबविण्यात आली. बुधवारी आयुक्तांनी येथील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त मनीज जोशी, संदीप माळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक प्रकाश बर्डे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भास्कर नगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागात झोपडपट्टींचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता. परंतु मागील १५ दिवसात येथून पालिकेने रोबोटीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. तर अजून शिल्लक ५० ते ६० मेट्रीक टन कचरा येत्या २ आॅक्टोबर पर्यंत काढला जाऊन येथील परिसर चकाचक केला जाणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी खालील बाजूस एका उद्यानाची निर्मिती केली जाणार असून जेणे करुन रेल्वेने प्रवास करणाºयांना येथे बघितल्यावर थोडे समाधान वाटणार आहे. शिवाय रेल्वेकडे चर्चा व पत्रव्यवहार करुन संरक्षक भिंत उभारण्यासाठी सांगितले जाणार आहे. याठिकाणी असलेल्या काही झोडप्यांमुळे येथे रेल्वे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील झोपड्या हटविण्याची कारवाईसुध्दा केली जाणार आहे. तसेच वरील भागात एक जलकुंभ उभारला जाणार असून भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असून त्या संदर्भातील प्रस्ताव आॅक्टोबरमधील महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला जाणार आहे.दरम्यान, बुधवारी येथील दोन शाळांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पारसिक बोगद्यावर ३०० हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. दुसरीकडे डायघर डम्पींग ग्राऊंड भागातील नागरीकांच्या सोई सुविधांसाठी तसेच येथील विकास कामांसाठी १५ ते २० कोटींचे विशेष पॅकेज दिले जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.
भास्कर नगर आणि वाघोबा नगरच्या विकासासाठी १० कोटींचा विशेष निधी, आयुक्तांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:12 PM
मागील १५ दिवसात पारसिक बोगद्यावरुन पालिकेने तब्बल ७० मेट्रीक टन कचरा काढला आहे. त्यानंतर बुधवारी याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली.
ठळक मुद्देरेल्वे मार्फत संरक्षक भिंत उभारली जाणारजलकुंभही उभारला जाणार