ठाणे : कोरोनाच्या काळात जिथे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. मात्र अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटरचे काम अविरत सुरू होते. कळवा रुग्णालयातच छोटेखानी कक्ष आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतच होतो. उलट या काळात पीडित महिलांना घराबाहेर पडून आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईलच असे नाही हे लक्षात घेता या कोरोना काळात आम्ही हेल्पलाइन सुरू केली होती. त्यावरही अनेक तक्रारी येत होत्या आणि अनेक महिलांच्या समस्या जाणून आम्ही त्यांना सहकार्य करत होतोच, असे अनुभव ठाणे सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक कविता थोरात यांनी मांडले. कोरोनाची भीती होतीच, पण आपल्या कामाची जबाबदारी ओळखून आमची संपूर्ण टीम काम करतच होती. आमच्या कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच आम्ही कोरोना काळातही अखंडपणे काम करू शकलो.
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची माहिती घेऊन, त्यांना पोलीस स्टेशनला जाण्यास मदत करणे, त्यांना समुपदेशकाचे मार्गदर्शन मिळवून देणे ही कामे आम्ही या काळातही प्राधान्याने केली, असे थोरात सांगतात.