मीरा रोड : मीरा-भाईंदर शहरातील १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील पालिका सभागृहात बुधवारपासून विशेष लसीकरण केंद्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी शहरातील १७९ दिव्यांगांना लस देण्यात आली.
मीरा-भाईंदरमध्ये केंद्र सरकारकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम बारगळली आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते. जेणेकरून शहरातील दिव्यांगांना केंद्रांवर लस मिळणे अवघड झाले आहे. तासन्तास रांगेत उभे राहणे त्यांना शक्य नाही. आयुक्त दिलीप ढोले यांनी ही बाब लक्षात घेता दिव्यांगांसाठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आता भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील महापालिकेच्या मोरेश्वर पाटील भवन येथील तळमजल्यावर असलेल्या सभागृहात बुधवारपासून सकाळी १० ते ४ या वेळेत स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले आहे. दिव्यांगांना या केंद्रात थेट येऊन लस घेता येणार आहे. दिव्यंगत्वाचा सरकारी दाखल आदी पुरावे सोबत आणावे लागणार आहेत. बुधवारी आयुक्त ढोले, सभापती मीना कांगणे, लसीकरण अधिकारी डॉ. अंजली पाटील आदींच्या उपस्थितीत लसीकरण केंद्रास सुरुवात झाली.