मीरा रोड : शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यांनी एका तरुणाचा बळी घेतला आहे. खड्डे कायम असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने मात्र एका खाजगी नवरात्रोत्सवासाठी चक्क भरपावसात बेकायदा डांबरी रस्ता बनवण्याचे काम केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे.भार्इंदर पश्चिमेला उड्डाणपुलाखालून मीरा रोडच्या दिशेला जाणाºया रस्त्यावर फारशी लोकवस्ती नसून वर्दळही नाममात्र असते. तरीही, पालिकेने काही वर्षांपूर्वी येथे डांबरी रस्ता बनवून ठेवला आहे. आता या ठिकाणी नवरात्रोत्सव होणार आहे. या ठिकाणी मोठे कलाकार आणले जाणार असून नवरात्रीच्या आड राजकीय प्रसिद्धीचा दांडियाही रंगणार आहे.दरम्यान, महापालिकेने या राजकीय वरदहस्त असलेल्या हायप्रोफाइल नवरात्रीसाठी या ठिकाणी असलेला जुना रस्ता न खोदताच आहे, त्या रस्त्यावर चक्क खडी टाकून रस्ता उंच केला आहे. खडीवर डांबर टाकले आहे. पावसाळा सुरू असताना त्या ठिकाणी खडी व डांबराचा वापर करून रस्ता बनवणे चुकीचे आहे. पालिकेने मात्र पॅचवर्कच्या नावाखाली चक्क रस्ताच नवरात्रीसाठी बनवून दिला आहे.महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. पालिका सूत्रांनी मात्र खड्डे पडले होते म्हणून रस्ता बनवल्याची सारवासारव केली आहे. शहरातील अन्य रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिका प्रशासन कधी बुजवणार असा सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे.मनसेकडून टीकेची झोडयाप्रकरणी मनसेचे गणेश बामणे यांनी पालिकेवर टीकेची झोड उठवली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीव खड्ड्यांनी जात असताना पालिकेला मात्र त्याच्याशी काही देणेघेणे नाही. शहरभर खड्डे पडले असताना तेथे मात्र पावसाचे कारण दिले जाते आणि येथे मात्र महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या संस्था-कंपनीच्या खाजगी व्यावसायिक नवरात्रोत्सवासाठी मात्र रस्ताच बनवून दिल्याचे सांगत बामणे यांनी निषेध केला आहे.
नवरात्रीसाठी विशेष मेहेरबानी; भरपावसात बनवला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:34 PM