उल्हासनगर : भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास विरोध केल्याने ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आणि रातोरात त्यांना ‘वर्षा’वर बोलावून घेण्यात आले. तत्पूर्वी, या प्रवेशाला विरोध करणारे भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी बोलावून त्यांची समजूत काढल्याची माहितीही हाती आली आहे.ओमी कलानी यांनी सहा महिने अगोदरपासून उल्हासनगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले, तरी स्वत:ची टीम स्थापन करून त्यांनी आखणी सुरू केली होती. त्याची आखणी, रचना पाहता ते दिवाळीनंतर भाजपात जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिल्याने आणि नंतर श्वेता शालिनी यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर या प्रक्रियेला गती आली. त्यानंतरही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी कोअर कमिटीला हाताशी धरत सतत ओमींच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याने हा प्रवेश सतत तळ््यात-मळ््यात होता. शिवसेनेशी युती तुटणार असेल, तर स्वबळावर उल्हासनगरची सत्ता हाती घेण्यासाठी ओमी कलांनी यांना पक्षासोबत किंवा थेट पक्षात घेणे हा पर्याय पक्षातील एका गटाने सुचवला. ओमी यांना प्रवेश दिला, तर त्यांची पक्षातील ताकद वाढेल आणि त्यामुळे आपले महत्त्व कमी होईल, या भीतीपोटी आयलानी यांनी विरोधाची धार तीव्र करत नेली. त्यामुळे पक्षातील दुसरा गट बिथरला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना हाताशी धरत पुन्हा ‘ओमी यांना आणा आणि पक्ष वाढवा,’ अशी मोहीम आखली. त्यांना प्रवेश देत नसाल, तर आम्हीच पक्ष सोडून त्यांच्या टीममध्ये जातो असा पवित्रा घेतल्याने अखेर कोअर कमिटीत या बंडखोरांना स्थान देत विरोधाची धार बोथट करण्यात आली. सिंधी समाजाच्या बळावर भाजपाचे राजकारण चालत असले, तरी त्या समाजात पक्षाला ओमींइतके स्थान नाही. शिवाय निवडून येण्याच्या निकषावर राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा मुद्दाही भाजपात गौण बनला आहे. त्यामुळे ओमी यांचा मार्ग मोकळा बनला. त्यावर कार्यकारिणीत शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)
ओमींसाठी ‘वर्षा’वर खास बैठक
By admin | Published: January 13, 2017 7:00 AM