ठाणे : नाशिक आणि वसई-विरार दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोविड हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये तसेच हॉस्पिटलमधील ऑक्सिजन व विद्युतपुरवठा तसेच अग्निशमन सुरक्षा सुरळीत कार्यरत राहण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी दिले.
यात ठाणे शहरातील महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन साठा, ऑक्सिजन व्यवस्था आणि वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणे, शहरातील खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा व वितरणप्रणाली तपासणे आदी कामांसाठी बायोमेडिकल इंजिनिअर मंदार महाजन यांची नियुक्ती केली आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये विद्युतपुरवठासंदर्भातील कामकाज पाहण्यासाठी उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून, हॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणेच्या नियंत्रणासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांची नियुक्ती केली आहे.