लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापौर, उपमहापौर यांच्या सतर्कमुळे रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पुरेसा असला तरी ऑक्सिजन संपण्यापूर्वी साठा करून ठेवावा लागत असल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. शहरात एकूण २५० पेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून, एकट्या महापालिका कोविड रुग्णालयातील रुग्णांना तीन दिवसांसाठी सहा हजार लिटर ऑक्सिजनची गरज लागत असल्याची माहिती अशान यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते सुट्टीवर आहेत. सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना, शहरातील रुग्णालयात जाणवला नाही. महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी आरोग्य सुविधेकडे जातीने लक्ष देऊन ऑक्सिजन साठा ठेवण्यावर भर दिला. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट-तिप्पट ऑक्सिजन लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. दर तीन दिवसाला सहा हजार लिटर ऑक्सिजन लागत असून, आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी तीन दिवसांचा ऑक्सिजन साठा ठेवण्यात येतो.
महापालिका व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल झाले नाहीत. तशी परिस्थिती शहरात निर्माण होत नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जुईकर यांनी दिली. शहरात २२०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, महापालिका कोविड रुग्णालय व आरोग्य सेंटरमध्ये १५० पेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर तेवढेच खासगी रुग्णालयात असल्याची माहिती दिली. महापालिका तळोजा व अंबरनाथ एमआयडीसीमधून शहराला ऑक्सिजनचा पुरवठा होत असून, महापौर अशान ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या संपर्कात असतात. नगरसेवक अरुण अशान यांनीही शहराला ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून थेट ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अंबरनाथ एमआयडीसीमधील कंपनीत दिवसाआड भेट देऊन ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. महापालिकांसह खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
चौकट
सकाळ, संध्याकाळ घेतला जातो आढावा
मध्यवर्ती रुग्णालयात ऑक्सिजन साठविण्यासाठी टँक उभारला असून, कॅम्प नं. ४ येथील कोविड रुग्णालयात जम्बो ऑक्सिजन सिलिंडर ठेवले आहेत. तसेच दररोज सकाळी-संध्याकाळ ऑक्सिजन साठ्याबाबत आढावा घेत असल्याची माहिती महापालिकेेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली.