कल्याण : महिलांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देताना राज्य सरकारकडून केवळ महिलांसाठी ३०० तेजस्विनी बस पुरवल्या जाणार आहे. त्यापैकी चार बस कल्याण-डोंबिवली महापालिकेस दिल्या जाणार आहेत. त्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने एक कोटी २० रुपयांचा निधी महापालिकेस दिला आहे. या बसखरेदीच्या विषयाला सोमवारी, २० नोव्हेंबरला होणा-या महासभेत मंजुरी दिली जाणार आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन ताफ्यात सध्या २१८ बस आहेत. मात्र, त्यापैकी एकही बस महिला विशेष म्हणून चालवली जात नाही. महिलांसाठी विशेष बस पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारकडून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली व नागपूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमास या बस पुरवल्या जाणार आहेत. बसखरेदीसाठी राज्य सरकारने या महापालिकांच्या परिवहन उपक्रमास निधीही दिला आहे. त्यामुळे तेजस्विनी बस महापालिका हद्दीत सुरू करण्याचा ठराव परिवहन समितीने मे २०१७ मध्ये मंजूर केला आहे. महापालिका चार तेजस्विनी बस खरेदी करणार आहे. त्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रियेनुसार निविदा काढण्यास मंजुरी दिली आहे. बसखरेदीनंतर त्याच्या देखभाल, दुरुस्तीची व संचालनाची जबाबदारी महापालिकांची राहणार असल्याने हा विषय २० नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.तेजस्विनी बसखरेदीसाठी मुंबई महापालिकेस ११ कोटी, पुणे महापालिकास १० कोटी, तर नागपूर महापालिकेस ९ कोटी २५ लाख रुपये निधी दिला आहे. नवी मुंबईला अडीच कोटी, ठाणे महापालिकेस सहा कोटी दिला आहे. सगळ्यात कमी निधी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमास मिळाला आहे. महापालिकेने चारच महिला विशेष बस पाठवण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार, राज्य सरकारकडून हा निधी उपलब्धझाला आहे.नव्या वर्षात बस धावणार : तेजस्विनी बस सुरू होणार असल्याने महिलांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. महासभेची मंजुरी, महिला चालक-वाहक भरती आणि प्रत्यक्ष तेजस्विनी महिला बस रस्त्यावर धावण्यासाठी नवे वर्ष उजाडणार असल्याचे बोलले जात आहे. दोन अबोली रिक्षा रस्त्यावरमुंबई, ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी अबोली रिक्षा सुरू करण्यात आल्या. त्यासाठी आठ महिलांना या रिक्षांचे परमिट देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात दोन महिलाच कल्याणमध्ये अबोली रिक्षा चालवतात. अबोलीप्रमाणेच तेजस्विनी महिला विशेष बसचाही प्रयोग फसू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिलांसाठी १०० टक्के राखीवतेजस्विनी बस १०० टक्के महिला प्रवाशांसाठी आरक्षित असतील. महिला विशेष बसचे तिकीटदरही प्रचलित प्रवासी तिकिटांप्रमाणे असेल. सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान या बस धावतील. या बससाठी महिला चालक व महिला वाहक उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. बसचालक व वाहकांचे काय?महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील २१८ बससाठी महापालिका चालक व वाहक उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. त्यामुळे बस जास्त असूनही केवळ त्या रस्त्यावर येऊ शकत नाही. महिला विशेष बसलाही महिला चालक व वाहक उपलब्ध करून देण्यास परिवहन व्यवस्थापन पुरे पडेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महिलांसाठी धावणार विशेष ‘तेजस्विनी’ बस, चार बसखरेदीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:30 AM