मुंबई - ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वेकडून रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० (१० तास) दरम्यान कळवा -मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Special traffic and power block for 5th and 6th lanes between Diva and Thane)
कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत सुटणा-या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल, पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान सुटणा-या आणि सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय सेवा सकाळी ७.३८ वा. असेल. ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६.०२ वा. असेल. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहेत परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक प्रभावित ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.