कल्याण : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. अनुचित प्रकार आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन यावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथकांची बारीक नजर राहणार आहे. तसेच उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी मिळवण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू केल्याची माहिती आचारसंहिताप्रमुख व ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी ‘लोकमत’ला दिली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किसन जावळे आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी अजिंक्य पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक खिडकी योजना’ पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयातील जिमखान्यात सुरू केली आहे. राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांनी सभा, मेळावे, रॅली, प्रचाराची वाहने आदींबाबत परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. याचठिकाणी २४ तास तक्रार स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापनाही केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी भरारी पथके (फ्लाइंग स्क्वॉड) तयार करण्यात आली आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात अशी चार पथके असतील.स्थिर सर्वेक्षण पथक : कल्याण शहरातील गांधारी, दुर्गाडी, पौर्णिमा चौकी आणि गोवेली (फळेगाव) या ठिकाणी ‘चेक पोस्ट’ तयार केले असून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) तयार केली आहेत. दोन शिफ्टमध्ये हे पथक काम करणार असून त्यात पथकप्रमुखासह एक सहायक, एक व्हिडीओग्राफर आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. अशी चार पथके नियुक्त केली आहेत.व्हिडीओ शूटिंगद्वारे वॉच : प्रचारादरम्यान राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे, रॅलीमध्ये आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही, तसेच या कार्यक्रमासाठी उमेदवाराने नमूद केलेला खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यात तफावत आहे का, याबाबत पाहणी आणि पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी या कार्यक्रमांचे व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकात एक अधिकारी आणि व्हिडीओग्राफरचा समावेश आहे.