अनिकेत घमंडी ।डोंबिवली : शहरात पुरेशा वाहनतळांअभावी रस्त्यांवर सम-विषम तारखेनुसार (पी१-पी२) पार्किंगव्यतिरिक्त कुठेही मनमानीपणे वाहने उभी केली जात आहेत. रेल्वेस्थानक परिसरात बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. परिणामी, शहराच्या वाहतूक नियोजन सपशेल कोलमडते. पण, बाजीप्रभू चौकातील चिमणी गल्लीतील केडीएमसीच्या वाहनतळाचा गणेशोत्सवानंतर शुभारंभ होणार आहे. त्यात २०० दुचाकी आणि १५ चारचाकी वाहने उभी राहू शकणार आहेत. त्यामुळे शहरातील पार्किंगची समस्या काही अंशी निकाली निघेल, असा दावा केला जात आहे.केडीएमसीने बाजीप्रभू चौकात २०१२ मध्ये या वाहनतळाचे काम हाती घेतले. आठ हजार ९०० चौरस फुटांचे हे भव्य वाहनतळ आहे. त्यात बेसमेंटमध्ये १२६ दुचाकी, १२ चारचाकी वाहने तर पहिल्या मजल्यावर ६५ दुचाकी आणि तीन चारचाकी वाहने उभी करण्याची सोय आहे, अशी माहिती वाहनतळाचे वास्तूविशारद राजीव तायशेटे यांनी ‘लोकमत’ला दिली. सध्या बेसमेंट व पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवानंतर हे वाहनतळ नागरिकांसाठी खुले केले जाईल, असा मानस महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केला.शुल्काचा निर्णय नाहीवाहनतळाची सुविधा सशुल्क असणार आहे. मात्र, किती तासांसाठी किती शुल्क आकारले जाणार?, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्याबाबतचे धोरण लवकरच निश्चित होणार आहे. कल्याणमधील वाहनतळाप्रमाणेच येथेही शुल्क आकारले जाईल, असे देवळेकर म्हणाले.स्वतंत्र स्वच्छतागृहया वाहनतळात बेसमेंट व पहिल्या मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. मात्र, त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार का ही सुविधा मोफत असेल, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.‘ते’ पार्किंग बंद करावाहनतळ सुरू झाल्यावर फडके रोड किंवा मानपाडा रोड येथील शिवाजी महाराज पुतळा ते चार रस्ता पर्यंतचे पी१, पी२ पार्किंग बंद करावे. त्यामुळे या रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी काही अंशी कमी होईल. अन्यथा ही सुविधा जरी उपलब्ध झाली तरीही पादचारी आणि वाहनचालक यांना त्याचा फारसा काहीही लाभ होणार नाही, असे शहरातील जाणकारांचे मत आहे.
वाहनतळाला लवकरच गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:12 AM