मुंब्रा : नवी मुंबईतील नियोजित विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी सिडको भवनावर मोर्चा काढण्यात येणार होता. या नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमार्गे न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदराकडे तसेच भिवंडी, गुजरातच्या दिशेने होणारी अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक मुंब्रा बायपासमार्गे वळवली होती. यामुळे शीळ फाटासह मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच बायपास रस्त्यावर इतर दिवसांपेक्षा वाहनांची संख्या कमालीची वाढली होती. यामुळे सकाळी ११ नंतर काही काळ येथील रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावला होता. वाहतूक वळवण्यात आल्याच्या पूर्वघोषणेमुळे वाहतूककोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत सुरू राहावी. यासाठी नियोजन केले होते. याअंतर्गत शीळ फाटा, कल्याण फाटा तसेच वाय जंक्शन येथे वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते. यामुळे वाहतूककोंडी झाली नाही, असा दावा मुंब्रा (उप विभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी केला.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:28 AM