ऑनलाइन लोकमतकल्याण, दि. 26 - श्रीमलंग गड परिसरातील गावांमधील पाणीटंचाई हटवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय यंत्रणा प्रतिसाद देत नसल्यामुळे सोमवारी झालेल्या खरीप आढावा बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर येथील जलसंवर्धनाच्या कामांना गती मिळाली असून, पावसाळा सुरू व्हायच्या आत येथील सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी दिले. खरड, काकडवाल, कुशिवली, करवले, पोसरी-शेलारपाडा,चिंचवली येथील बंधाऱ्यांची उंची वाढवणे,गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, तसेच, उसाटणे येथील तलावाचे खोलीकरण ही कामे तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या आदेशांनुसार खरड येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम खा. डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत तातडीने हाती घेण्यात आले.खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह श्रीमलंग परिसरातील गावांना भेट देऊन तेथील तलाव आणि बंधाऱ्यांची पाहणी केली. हे तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ गेल्यावर्षी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन काढला होता. त्यामुळे येथे पाणी साठवण्याची क्षमता कोट्यवधी लिटरने वाढली. मात्र, काही बंधाऱ्यांची उंची वाढवणे, तसेच गळती रोखण्यासाठी डागडुजी करण्याचे प्रस्ताव तयार करण्याबाबत गेल्याच वर्षी खा. डॉ. शिंदे यांनी सुचवले होते. परंतु वर्ष उलटल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्यामुळे आढावा बैठकीत खासदारांनी रोष व्यक्त केला होता.खा. डॉ. शिंदे यांच्या नाराजीची दखल बुधवारी या पाहणी दौऱ्याची आयोजन करण्यात आले होते. कुशिवली येथील वनबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश डॉ. कल्याणकर यांनी यावेळी लघुपाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते प्रभाकर यांना दिले. तसेच, चिंचवली येथील दोन बंधाऱ्यांची उंची वाढवण्याचे कामही आठवड्याभरात सुरू करण्याचे आदेश दिले. करवले येथील बंधाऱ्यात गाळ काढणे आणि उंची वाढवण्याच्या कामालाही त्वरित सुरुवात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्याच्या आत पूर्ण करण्यात येतील व त्यासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, याबाबत डॉ. कल्याणकर यांनी खासदार डॉ. शिंदे यांना आश्वस्त केले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कृषीअधिकारी महावीर जंगटे, कार्यकारी अभियंता प्रभाकर, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, गटविकास अधिकारी सोनटक्के, शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे आदी उपस्थित होते.मलंग परिसरामध्ये पावसाचे पाणी आडवण्यास मोठ्या प्रमाणावर वाव असून त्यामुळे येथील शेतीचा विकास करणे देखील शक्य असल्याचे खा. डॉ. शिंदे म्हणाले. गेल्या वर्षी केलेल्या कामांमुळे या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भाजीपाला घेणे शक्य झाले असल्याचेही त्यांनी डॉ. कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकत्याच पार पडलेल्या खरीप हंगामाच्या बैठकीत मलंग परिसरात पाणी अडवण्याकरता स्वतंत्र आराखडा करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
श्रीमलंग गड परिसरातील जलसंवर्धनाच्या कामाला गती
By admin | Published: April 26, 2017 5:44 PM