अंबरनाथ- अंबरनाथच्या एस थ्री पार्क हॉटेलच्या परिसरात कुटुंबाच्या वादात एका भावाने दुसऱ्या भावाच्या चार चाकी गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक झाल्यानंतर पुन्हा गाडी वळवून समोरून त्या गाडीला धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत रस्त्यावरील दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तर गाडीचा चालक देखील जखमी झाला आहे.
आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर दोन भावांच्या वादात कुटुंबावरच हल्ला करण्याचा प्रकार घडला. ज्या चार चाकी गाडीमध्ये एक भाऊ आपल्या कुटुंबीयांसह बसला होता त्याच गाडीला आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला जखमी करण्याचा प्रयत्न दुसऱ्या भावाने केला.
एवढेच नव्हे तर त्या जखमी ड्रायव्हरला फरफटत गाडीखाली नेले आणि पुन्हा गाडी वळवल्यानंतर समोरून पुन्हा एकदा जोरदार धडक दिली. त्यामुळे या चार चाकी गाडीच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर या दोन भावांच्या वादात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्या गाडीला धडक देण्यात आली त्या गाडीत लहान मुलं आणि महिला देखील होत्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली
बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडिल बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातु तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी आपल्या वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांची पत्नी तसेच कुटूंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांनाही फरफडत नेले. त्यानंतर पुन्हा पुढे नेलेले वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटूंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत दुसऱ्या वाहना मागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात ठोकर बसून ते फॉर्च्युनर गाडी खाली आल्याने जखमी झाले. यानंतर रस्त्यावरील नागरीकांनी जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.