ठाणे : ठाणे महापालिकेच्या सावरकरनगर भागातील शाळा क्रमांक-१०३ मधील इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर, सिनिअरच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विश्वासात न घेता येथील सुमारे १०८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत, शिक्षण विभागाशी चर्चा करूनही त्यांनी आपली भूमिका न बदलल्याने अखेर शुक्रवारी संतप्त पालक आणि त्यांच्या पाल्यांनी महापालिकेवर धरणे आंदोलन केले. याचे नेतृत्व आम आदमी पार्टी आणि ठाणे मतदाता जागरण अभियानने केले होते. यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुलांचे स्थलांतर होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
सावरकरनगर येथील ठाणे महापालिकेच्या इंग्रजी शाळेतील पूर्व प्राथमिक वर्ग हे खाजगी संस्थेला सुरू करण्यासाठी दिले आहेत. शिक्षण समितीचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा देऊन शाळा बचावासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा पालकांनी यापूर्वी दिला होता. परंतु, शिक्षण विभागाने आपला हट्ट न सोडल्याने अखेर शुक्रवारी पूर्व प्राथमिकचे सर्व लहान विद्यार्थी महापालिका मुख्यालयावर धरणे आंदोलनाला बसले होते. नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय मुलांना हलवले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने कबूल केले होते. परंतु, त्याआधीच विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. त्यांच्या शाळेचे वर्ग खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिले जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही शाळा इमारत खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय रद्द करावा. लहान मुलांचे स्थलांतर करू नये आणि त्यांना सुरक्षित जागेतून धोकादायक व अडचणीच्या जागेत पाठवू नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.पालक धडकले शाळेवरशिक्षण विभागाने ही शाळा या संस्थेला दिलेली नसून उलट तिच्या फंडाच्या माध्यमातून त्या शाळेतील वर्गखोल्या सुशोभित केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण सभापती विकास रेपाळे आणि उपायुक्त मनीष जोशी यांनी केले. ही शाळा कोणत्याही संस्थेला चालवायला दिलेली नाही. ती महापालिकेच्या मालकीचीच आहे. वर्गखोल्यांचे त्या खाजगी संस्थेच्या सीएसआर फंडातून सुशोभीकरण केल्याचेही स्पष्ट केले.