बदलापूर : बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटीवर भरवण्यात आलेल्या बदलापूर महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन दिवसांत ८ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी येथील कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत येथील जत्रेचाही आनंद घेतला आहे. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने या महोत्सवाला सुरुवात झाली. यंदा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने बाळासाहेबांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या अनोख्या गीतांचा कार्यक्रम ‘जात गोत्र धर्म शिवसेना’ याचे आयोजन केले होते. बाळासाहेबांची थोरवी या माध्यमातून बदलापूरकरांना अनुभवता आली. तर, दुसऱ्या दिवशी सदाबहार लावण्यांची मेजवानी होती. ‘ढोलकीच्या तालावर’फेम सायली पराडकर आणि त्यांच्या लावणी टीमने बदलापूरकरांना ढोलकीच्या तालावर चांगलेच नाचवले. तीन तास चाललेल्या या कर्यक्रमात लावणीचा अनोखा नजराना बदलापूरकरांना अनुभवता आला. लावणी पाहण्यासाठी बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने चौपाटीवर गर्दी केली होती. प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या खुर्च्या भरल्यावरही अनेक प्रेक्षकांनी उल्हास नदीवरील पुलावर उभे राहून या लावणीचा आनंद घेतला. रविवार ‘मला लगीन करायचंय’फेम मानसी नाईक यांच्या नृत्यामुळे चांगलाच गाजला. मानसी नाईक आणि सिद्धेश पै यांच्या जोडीने बदलापूरकरांचे चांगलेच मनोरंजन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बदलापूर महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: February 21, 2017 5:33 AM