ठाणे : वाचक कट्टयावर केवळ कथेचेच अभिवाचन नाही तर जेष्ठ कवींच्या कविता देखील सादर केल्या जात असून रसिकांचा याला वाढता पाठिंबा दिसत आहे.या वाचक कट्टयावर कवी गजानन जोशी यांनी "कवितेसाठी तासभर" हा कार्यक्रम सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
गजानन जोशी हे बॅकेत कर्मचारी म्हणून काम करत असले तरी त्यांना वाचनाचा व गाणी ऐकण्याचा छंद आहे. जोशी यांनी या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी,मंगेश पाडगावकर,वसंत बापट,विं.दा करंदीकर,अरुण कोल्हटकर या व अश्या अनेक जेष्ठ कवींच्या कविता सादर केल्या. वेंगुर्ल्याच्या पाऊस,मन वढाये वढाये,काय डेंजर वारा सुटलाय,दख्खन राणी,साठीचा गजल,सांगा कसं जगायचं,गण्यावरच बोल गाणं या कविता सादर करत प्रेक्षकांना एका वेगळ्याच वातावरणात नेले. तसेच, यावेळी कट्ट्याच्या कलाकारांनी देखील अभिवाचन केले.उत्तम ठाकूर यांनी पूल देशपांडे लिखित "प्रेमपत्र",शुभांगी भालेकर यांनी पूल देशपांडे लिखित "दोन शब्द जगण्याविषयी",धनेश चव्हाण याने "थकलेल्या बापाची कहाणी" या कथेचे अभिवाचन केले. सहदेव कोळंबकर याने कुसुमाग्रज यांच्या "किनाऱ्यावर सैनिक" या कवितेचे वाचन केले.अमित महाजन याने अशोक महाजन यांच्या "गोधडी" या कवितेचे वाचन केले.परेश दळवी याने संदीप खरे यांची "समजूत" व स्वलिखीत "गोष्ट वेड्या पावसाची" हि कविता सादर केली.तसेच यावेळी अभय पवार याने "प्रेमाची गोष्ट" ही एकपात्री सादर केली. यावेळी निवेदन ओमकार मराठे याने केले व दीपप्रज्वलन गजानन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ वाचन संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी म्हणून नाही तर येणाऱ्या दिवसात वाचन संस्कृतीचा ह्रास होऊ नये म्हणून वाचक कट्टा सारखे उपक्रम जिवंत ठेवणे गरजेचे आहे असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले. हल्लीच्या लहान मुलांना इंग्लिश सहज समजतं पण मराठीची हवी तशी ओळख नाही, पालकांनी पुढाकार घेऊन यात लक्ष्य घातलं पाहिजे असेही नाकती म्हणाले.