मुंब्रा : आमृतनगर, रेल्वेस्थानक परिसर,आनंद कोळीवाडा, अमृतनगर, कौसा, रशिद कम्पाउंड, संजयनगर आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी वीकेंड लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे येथील विविध प्रकारच्या वस्तूविक्रीची दुकाने सलग दुसऱ्या दिवशीही बंद होती. दरम्यान, शनिवारी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवलेल्या येथील विविध भागांतील काही फळ तसेच भाजीविक्रेत्यांनी रविवारी त्यांचे व्यवसाय सुरू ठेवले होते. यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये स्थानिक नागरिकांची तुरळक गर्दी दिसत होती. ठिकठिकाणी काही तरुण तसेच व्यापारी एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. बंद असलेल्या बाजारपेठांमुळे मोकळ्या असलेल्या रस्त्यावर बकऱ्या, कुत्रे हे मुके प्राणी मुक्तपणे संचार करताना दिसत होते. प्रवासी कमी असल्यामुळे बहुतांशी रिक्षाचालकांनी रिक्षा रस्त्यावर आणल्या नव्हत्या. यामुळे रस्त्यावर तसेच रेल्वेस्थानकाजवळील प्रमुख थांब्यांवर तुरळक रिक्षा दिसत होत्या. येथील दूध तसेच औषध विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुकाने उघडली होती.
मुंब्र्यात दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:38 AM