ठाणे: भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्या वतीने रविवारी ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन रॅलीला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे उद्घाटन महापालिका मुख्यालय येथे उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडिया आणि येथून सकाळी ठाणे फ्रिडम सायक्लोथॉन या ७५ किमीच्या रॅलीला सुरूवात झाली. ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया आणि परत ११ वाजता ही रॅली ठाण्यात दाखल झाली. या रॅलीमध्ये महिला सायकलस्वारांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. हिरानंदानी मिडोज येथे सकाळी ७ ते ८ यावेळेत आयोजिलेल्या ‘ठाणे-कार फ्री रॅली सायकल टू वर्क’ या रॅलीचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झाला.
प्रत्येकाने सायकलचा वापर करण्याचे ठरविले, तर निश्चितच प्रदूषणमुक्त ठाणे शहर करू, असा विश्वास व्यक्त करीत उपमहापौर कदम यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. हिरानंदानी मिडोज येथे आयोजिलेल्या सायकल रॅलीदरम्यान राष्ट्रीय, राज्य स्तरावर विशेष कामगिरी केलेल्या प्रसाद खैरनार, गुरुप्रित सिंग, नारायण बारसे, सौदामिनी, चंद्रकांत जाधव, रेहाना शेख, प्रवीणकुमार कुलथे आणि सरप्रीत नारू यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील सायकलस्वारांसाठी सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन बायसिकल मेयर ऑफ ठाणे चिराग शहा आणि युवासेनेचे ठाणे शहर अध्यक्ष नितीन लांडगे यांनी दिले. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले. यावेळी खासदार विचारे, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक राजेश मोरे आणि क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.