भिवंडी :लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने मोर्चे बांधणी करण्यात सुरुवात केली असून ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या गाव चलो अभियान या उपक्रमात प्रवासी कार्यकर्ते प्रत्येक बूथ मधील नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यास उस्फुर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याची माहिती गाव चलो अभियान प्रदेश संयोजन समितीचे सहसंयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी गुरुवारी भिवंडीत दिली आहे.
राज्यातील सर्व खेडोपाडी व शहरातील सर्व बूथ यामध्ये हे प्रवासी कार्यकर्ते एक दिवस २४ तास त्या गावात राहून स्थानिक नागरिक,युवक,महिला,शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय,माजी सैनिक,आशा अंगणवाडी सेविका ,लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत. यामध्ये नागरिकांकडून योजना राबविताना येणाऱ्या अडचणी समजून घेत सूचना सुध्दा स्वीकारणार असून त्याचा उपयोग निवडणूक जाहीरनामा बनवताना होणारा आहे अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली. कोकण विभागात एकूण सहा लोकसभा मतदार संघात पक्षाच्या १४ संघटनात्मक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात असून आता पर्यंत त्यास नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रवासी कार्यकर्ते यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील कार्यकर्ते ग्रामीण भागात काम करतील तर लोकसभा निवडणुका पूर्ण होई पर्यंत दर पंधरा दिवसांनी हे प्रवासी कार्यकर्ते नेमुन दिलेल्या गावांना भेटी देतील अशी माहिती हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील कोनगावात राबविणार अभियान
गाव चलो अभियान अंतर्गत सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी सर्वसामान्य प्रवासी कार्यकर्ते म्हणून आपले योगदान देणार आहेत.यामध्ये केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे रविवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्या पासून कोनगाव या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ते म्हणून अभियानात सहभागी होणार आहेत अशी माहिती देखील संयोजक हरिश्चंद्र भोईर यांनी दिली आहे.