ठाणे : राज्य सरकारने लागू केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशी रविवारी ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार असूनही मार्केट आणि रस्तेही ओस पडले होते. काही ठिकाणी मेडिकलच्या आडून भलत्याच सामानांची विक्री सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवरही पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. पोलिसांकडून कारवाई होण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तावर नसतानाही नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याचे पाहायला मिळत आहे. काही तुरळक ठिकाणी मात्र अनावश्यकपणे नागरिक रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. जांभळी नाका, टेंभी नाका त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ, इंदिरानगर आणि कळवा मार्केट या ठिकाणी एरवी गर्दी पाहायला मिळते. रविवारी मात्र लॉकडाऊनचे पालन झाल्याचे दिसले. दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे मार्केट परिसरात शुकशुकाट होता. स्टेशन रोड परिसरातही मुख्य भाजी मंडई, धान्य मार्केट बंद होते. अशीच परिस्थिती शास्त्रीनगर, वर्तकनगर आणि वसंतविहार या भागात होती. पोलिसांनीही बॅरिकेड्स लावून अनेक भागांतील रस्ते बंद केले होते. नेहमी गजबजलेला मासुंदा तलाव, चिंतामणी चौक, मानपाडा आणि हिरानंदानी इस्टेट या परिसरातही शांततेचे वातावरण होते.
विनाकारण फिरणाऱ्यांची बंदोबस्तावरील पोलिसांकडून कापूरबावडी नाका, माजीवडा नाका, नितीन कंपनी, तीनहात नाका आणि कळवा नाका आदी भागांमध्ये चौकशी केली जात होती. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांना मात्र समज देऊन पुन्हा घरी पाठविले जात होते. शनिवार आणि रविवारी केवळ औषध विक्रीची दुकाने सुरू असल्यामुळे कासारवडवली भागात एका मेडिकलच्या दुकानात चक्क इतर साहित्यांची विक्री केली जात असल्याचे आढळले. त्यामुळे या विक्रेत्याला नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
वाहतूक सुरू
ठाणे शहरात पूर्णपणे लॉकडाऊन असला तरी एसटी, टीएमटी, रिक्षा सेवा सुरू होती. प्रवासीच नसल्यामुळे टीएमटीच्या ५० टक्के फेऱ्या रविवारी कमी केल्या होत्या. मात्र, या वाहतुकीवर कोणताही परिणाम जाणवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दूध, भाजी, मांसाहारी पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सकाळी आणि सायंकाळी काही काळ सुरू होती.