बदलापूर : बदलापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने झालेल्या रोजगार मेळाव्याला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोनदिवसीय मेळाव्यात पहिल्याच दिवशी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी १४० जणांना विविध कंपन्या, बँका आदींकडून नोकरीसाठी ‘ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर’ देण्यात आले.शिवसेना बदलापूर शहर शाखेच्या वतीने शनिवारी (ता. ३०) बदलापूरमधील बॅरेज रोड परिसरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दोनदिवसीय रोजगार मेळावा ठेवला आहे. यात विविध क्षेत्रांतील सुमारे ५० नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. मेळाव्यात १५०० तरुणांनी नावनोंदणी केली आहे. त्यामध्ये दहावी, बारावीपासून विविध शाखांच्या पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यापैकी १४० तरुणांना ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर देण्यात आले. उद्याही सकाळपासून मुलाखती सुरू राहणार असून त्यातूनही उमदेवारांची निवड केली जाणार आहे. युवासेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाधिकारी प्रभुदास देसाई व म्हात्रे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर म्हात्रे यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांशी संवाद साधला.जास्तीतजास्त तरुण-तरुणींना व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवार आनंदित हाेते.
पन्नाशी गाठलेल्या महिला, पुरुषही उमेदवारांच्या रांगेतया रोजगार मेळाव्यात तरुणतरुणींप्रमाणे चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या महिला, पुरुषही दिसत होते. सध्या कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे रोजगार मेळाव्यात हे चित्र दिसत असल्याचे बोलले जात आहे.