- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रिडा संकुल गेल्या तीन वर्षांपासून त्यातील अपूर्ण कामांमुळे खुले होऊ न शकले नाही. यानंतर ते सुरु करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे तुणतूणे अखेर चार महिन्यांपूर्वी निकाली लागले. हे क्रिडा संकुल रॉयल्टीच्या माध्यमातुन सुरु करण्याला ८ जूनच्या स्थायी समितीने मान्यता दिली. परंतु, त्याचा करारच अद्याप होऊ न शकल्याने त्याचा मुहूर्त करारातच अडकल्याने ते केव्हा सुरु होणार, अशी चर्चा खेळाडू आणि क्रिडाप्रेमीमध्ये सुरु झाली आहे.
पालिकेने २०१४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण केलेले क्रिडा संकुल सततच्या तांत्रिक अडचणीत सापडल्याने ते स्थानिक खेळाडुंसाठी अद्याप पुर्णपणे खुले होऊ शकलेले नाही. गेल्या तीन वर्षांपासुन बंदावस्थेत असलेले संकुल गेल्या मार्च महिन्यात काही अंशी सुरु करण्यात आले. सध्या केवळ कॅरम, बुद्धीबळसारखे खेळ प्रशासनाने सुरु केले असले तरी अनेकदा ते बंद करण्यात येत असल्याचे खेळाडुंकडुन सांगण्यात येत आहे. ते पुर्णपणे सुरु करण्यासाठी धोरण निश्चित होत नसल्याचा दावा प्रशासनाकडुन करण्यात येत असतानाच पालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार संकुलाची अपुर्ण कामे एप्रिलमध्ये पुर्ण करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान त्याच्या धोरणांचा तिढा सुटल्यानंतरही त्याच्या निविदाप्रक्रीयेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण प्रशासनाकडुन पुढे रेटण्यास सुरु झाली. परंतु, हे क्रिडा संकुल स्थानिक खेळाडुंसाठी एप्रिलमध्येच खुले करण्याचा निर्धार राजकीय पक्षांकडुन करण्यात आला. त्यावेळी सेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी हे क्रिडा संकुल आपल्याच प्रभागांतर्गत येत असल्याने ते स्वपक्षाच्याच नेत्यामार्फत खुले करण्यात यावे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. सेनेच्या या मागणीला काटशह देण्यासाठी भाजपाने देखील त्याचे उद्घाटन स्वपक्षातील नेत्यांमार्फत उरकण्याचा घाट घालण्यास सुरुवात केली. ते सुरु होण्याच्या मार्गावर असताना ते कोणाच्या प्रयत्नाने सुरु झाले, हे राजकीय श्रेयाच्या वादात अडकले. अखेर दोन्ही पक्षांनी आमनेसामने येत धक्काबुक्कीत ते क्रिडा संकुल सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यश आले नाही. एकमेव क्रिडा संकुलाचे उद्घाटन राजकीय श्रेयकारणातुन तीनवेळा होण्याची शहरातील हि पहिलीच वेळ त्यावेळी ठरली. राजकीय श्रेयवादात क्रिडा संकुलाचा मुहुर्त टळल्यानंतर ते रॉयल्टीच्या माध्यमातुन सुरु करण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या. यात पालिकेचा एकही पैसा खर्च न होता क्रिडा संकुल चालविणाय््राा कंत्राटदाराकडुन पालिकेलाच रॉयल्टीच्या माध्यमातुन उत्पन्न मिळणार आहे. त्याला चार निविदाकारांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्यातील जास्त रॉयल्टी देणाय््राा निविदाकाराच्या निविदेला ८ जूनच्या स्थायी समितीने मान्यता दिली. परंतु, गेल्या चार महिन्यांपासुन कंत्राटदार नियुक्तीचा करारनामा अद्याप प्रशासकीय लालफितीत अडकला असल्याने क्रिडा संकुल सुरु होण्याचा मुहुर्तच प्रशासनाला सापडलेला नाही. यामुळे गेल्या तीन वर्षांपासुन एकमेव क्रिडा संकुल सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक खेळाडुंमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत पालिकेच्या क्रिडा अधिकारी दिपाली पोवार यांनी सांगितले कि, क्रिडा संकुलाचा करारनामा तयार करण्यात आला असुन तो मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळताच संबंधित कंत्राटदाराला क्रिडा संकुल सुरु करण्याचा कार्यादेश दिला जाईल.