कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत डेंग्यूचे ३०० पेक्षा जास्त संशयित रुग्ण आढळल्याने त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या आयुक्तांच्या आढावा बैठकीत उमटले. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारला. तसेच विशेष पथके स्थापन करून फवारणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. डेंग्यूचा फैलाव होण्यास नागरिकांच्या सवयीही तितक्याच जबाबदार आहेत, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. तेथील टोकेकर यांच्या कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच तेथील मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांच्या मुलालाही डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाइन फ्लूच्या आजाराने निधन झाले. त्यावरून महापालिकेचा आरोग्य विभाग हा निद्रावस्थेत असल्याचे उघड झाले.महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी पाण्याची समस्या असून, ती देखील डेंग्यूचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कल्याण पूर्वेतील उंचसखल भागामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करतात. साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यावर डेंग्यूच्या अळ्यांची पैदास झपाट्याने होते. नागरिकांनी पाणी जास्त काळ साठवून न ठेवता ते दर दोन दिवसांनी ओतून नवीन भरले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, डेंग्यूच्या फैलावासाठी नागरिकांच्या सवयी कारणीभूत ठरत आहेत.कल्याण पूर्वेत डेंग्यूचे रुग्ण आढळल्यावर त्या परिसरातील घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. त्यावेळी एका घरात जवळपास तीन कंटेरनमध्ये तसेच नव्याने बांधल्या जाणाºया इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी साठविण्यात येणाºया पाण्यातही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, अशी माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. आयुक्तांनी त्यावर आरोग्य व घनकचरा विभागाकडे विचारणा केली असता आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. आरोग्य व घनकचरा विभागाने संयुक्तरीत्या एक विशेष पथकाची स्थापना करावी. आरोग्य विभागाने आपले सर्वेक्षण सुरू ठेवावे. घनकचरा विभागाने डेंग्यूचे संशयित रुग्ण जेथे आहेत, तेथे धूरफवारणी करावी. तसेच जेथे धूरफवारणी केली आहे, तेथे पुन्हा सात दिवसांनी ती करावी. जेणेकरून डेंग्यूच्या अळ्या तयार होण्याचे चक्र भेदणे शक्य होईल, असे आयुक्तांनी सांगितले. तर, प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत एका गाडीद्वारे धूरफवारणी तसेच एका कर्मचाºयाद्वारे कीटकनाशक फवारणीसाठी सुरू आहे, अशी माहिती घनकचरा विभागाने दिली. आरोग्य विभागाच्या मते डेंग्यूविषयी जनजागृती योग्य प्रकारे झालेली नाही. त्यामुळेही पाणी साठवून ठेवण्याची सवय दूर होत नाही, असाही दुजोरा दिला आहे.रुग्णालयातच आढळल्या होत्या अळ्यामाजी मनसेचे नगरसेवक नितीन निकम यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. तर, भाजप नगरसेविका सुमन निकम यांनी एक निवेदन दिले आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरकिसनदास रुग्णालयात आरोग्य शिबिर घ्यावे, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, गीता हरकिसनदास रुग्णालयातच डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. रुग्णालय सुरक्षित नाही. तर नागरिकांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
डेंग्यूच्या साथीमुळे अधिकारी फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:25 AM