ठाणे : नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी ठाण्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय राखीव पोलिसांच्या तुकडीसह स्वयंसेवक, पोलीस मित्र संघटनांचे कार्यकर्ते अशी साडेतीन ते चार हजारांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून गैरप्रकारांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस उपायुक्तांच्या पातळीवर ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, तसेच गृहरक्षक दलाचे जवान, स्वयंसेवक, पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्तेही पोलिसांच्या मदतीला तैनात राहणार आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये पाचही परिमंडळासाठी नऊ पोलीस उपायुक्त, १४ सहाय्यक पोलीस आयुक्त, ९७ पोलीस निरीक्षक, २५७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२ महिला सहाय्यक निरीक्षक तथा उपनिरीक्षक, गृहरक्षक दलाचे ५०० पुरुष आणि १०० महिला तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चार तुकडया तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंडळांकडून ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादीत ठेवला जात आहे किंवा कसे, याबाबत दक्षता घेण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. ध्वनिप्रदूषण करणाºया मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार असून रात्रीच्या गस्तीवर भर देण्यात आला आहे.बुधवारपासून ठाण्यात नवरात्रोत्सवामुळे गरब्याच्या खेळाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. देवीच्या सार्वजनिक प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी दररोज भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना दिले आहेत.
नवरात्रोत्सवात छेडछाड रोखण्यासाठी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:16 AM